कृषीच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जन साधताना शेतकऱ्यांनाही फायदा करून द्यावा-डॉ अभय शेंडे
प्रवरेच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटरद्वारे कृषी क्षेत्रातील उद्योगांच्या संधी या विषयावर मार्गदर्शन
प्रवरानगर :ज्ञानाचे रूपांतर आर्थिक संपत्ती मध्ये करण्याचे शहाणपण हे अनुभवातूनच येत असते असे सांगताना राहता परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या डाळिंब पिकाच्या मुळावरील सूत्रकृमी आणि बुरशीवर अभ्यास करून प्रवरेत कृषीशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जन साधताना शेतकऱ्यांनाही फायदा करून द्यावा असे आवाहन पुणे येथील स्वस्ती ॲग्रो चे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.अभय शेंडे यांनी केले.
प्रवरानगर येथील कृषी आणि कृषी संलग्नित महाविदयालयामध्ये पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील डिझाईन इनोव्हेशन सेंटर द्वारे आयोजित केलेल्या कृषी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी व समर इंटर्नशीप या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रामध्ये डॉ.अभय शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. अविनाश जोशी,गोपाळ श्रीवास्तव,अरुण आयोडकर,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे,कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर, प्रा. नितीन साळी, प्रा. किशोर माळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी प्रास्तविक केले.
डॉ अभय शेंडे म्हणाले की,पुस्तक हे ज्ञान देते परंतु ज्ञानाचे अर्थार्जनामध्ये रूपांतर करण्याचे खरे शहाणपण हे अनुभवातून येत असल्याने कृषी संलग्नित विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला व्यावसायिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षण आणि इंटर्नशीपच्या माध्यमातून अनुभव आणि अर्थार्जनासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी दिला
कृषी महाविद्यालयातील प्रा. सारिका पुलाटे आणि डॉ. विशाल केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या चर्चासत्रासाठी कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रमसिंह पासले यांनी केले तर प्रा रमेश जाधव यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment