प्रवरेत अनोख्या उपक्रमातून नूतन वर्षाचे स्वागत


लोणी (प्रतिनिधी):
           नूतन वर्षाचे स्वागत व संकल्प घेणे असे अतूट नाते आहे. बहुतेक वेळा नवीन वर्षांमध्ये नवीन डायरी घेतली जाते आणि त्याच्या पहिल्याच पानावर संकल्प लिहिले जातात आणि गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी ते संकल्प तुटतात देखील. सरासरी संकल्प हे दैनंदिन जीवनातील घटनाक्रमात केलेला बदल असतो उदा. सकाळी पाच वाजता उठणे, सकाळी व्यायाम किंवा जीम ला जाणे, पबजी फक्त दोन तासच खेळणे इ.
             त्याच अनुषंगाने प्रवरेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने अनोखी संकल्पना राबवली, त्यामध्ये संकल्प वृक्षाची प्रतिकृती तयार करून महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेले नववर्षाचे संकल्प चिठ्ठीवर लिहून घेऊन त्यास संकल्प वृक्षाला टांगले आहेत. महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम समन्वय सौ. मीनल शेळके यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी संकल्प वृक्ष भोवती आपल्या संकल्पाबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती, काही विद्यार्थी संकल्प लिहिण्यासाठी वेळ घेत होते तर आपल्या जिवलग मित्राने केलेले संकल्प वाचून हशा पिकत होता आणि संकल्प पूर्ण करून दाखवण्यासाठी पैजा सुद्धा लावल्या जात होत्या.
             हा नाविन्यपूर्ण उपक्रम फक्त कार्यक्रम न राहता सर्व संकल्प चिठ्ठी यांचे एकत्रित करून पुस्तिका तयार करण्यात येणार असून वार्षिक बक्षीस वितरण समारंभात त्याचे अनावरण करून वर्ष सरतेशेवटी संकल्पपूर्ती बघितली जाणार आसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली. आपण केलेला संकल्प जेंव्हा जगजाहीर होतो त्यावेळेस तो पूर्ण करून दाखवण्याचा सामाजिक दबावामुळे विद्यार्थी व कर्मचारी नक्कीच त्यांचे संकल्प पूर्ण करतील अशी आशा कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी व्यक्त केली.
               सायंकाळी विविध रंगाच्या संकल्प चिठयांनी बहरलेला वृक्ष मनमोहक दिसत होता. सदर उपक्रम राबवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सहायक विद्यार्थी तरकसे अमोल, सोनवणे रोशनी, कुलाट कोमल, दीप्ती शेळके, आदित्य जोंधळे  व सौरभ केदार यांनी विशेष कष्ट घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस